लोणी काळभोर, (पुणे) : वाहन पार्किंगसह बाजारकरुंचे योग्य नियोजन करून शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजार दिवशी स्थानिकांसह व्यापारी वर्गाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली आहे.
लोणी काळभोर आठवडे बाजाराला प्राचीन इतिहास आहे. पूर्व हवेलीसह दौंड, पुरंदर, इंदापूर, शिरूर तालुक्यातून नागरिक बाजारात येत असतात. मात्र, गावाच्या विकासासोबत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आठवडे बाजारातील बकालपणा, बेशिस्तपणा, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांत वादविवाद होतात. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना आठवडे बाजारात कोणतीही सुरक्षा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक आणि व्यापारी आपापली वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावतात. त्यामुळेच वाहतूक कोंडी आणि प्रसंगी वादविवादही होतात.
दत्त मंदिर ते लोणी फाटा परिसर या मुख्य रस्त्यालाच पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना, शाळा, कॉलेज आठवडे बाजार असल्याने बाजार दिवशी नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिक, व्यापारी याच्यासाठी वाहन पार्किग साठी मराठी शाळेचे मैदान तसेच वनविभाग कार्यालयाजवळील जागा उपलब्ध करून देण्यात आली.
दरम्यान, बाजार परिसरात मुख्य रस्त्यावर वाहन पार्किग केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा सूचना पोलीस स्टेशन दिल्याने नागरिकांची होणारी गैरसोय व समस्यांवर उपाययोजना करून नागरिकांसह व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम ग्रामपंचायत व लोणी काळभोर पोलीस यांच्याकडून करण्यात आले आहे.
याबाबत लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या, ” सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक आणि व्यापारी आपापली वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावत होते. वाहन पार्किग बरोबरच आठवडे बाजारात होणाऱ्या मोबाईल चोऱ्या प्रामुख्याने रोखण्याचे काम महत्वाचे असून त्यासाठी लोणी काळभोर पोलीस यांच्या मदतीने प्रयत्न करणार आहोत. तसेच सर्विस रस्त्याला पथ दिवे लावुन संध्याकाळच्या वेळी ये-जा करताना होणारी महिलांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे.”