लोणी काळभोर ( पुणे ) : गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त काळ संपूर्ण पुणे शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट उरुळी देवाची व फुरसुंगी गावात लावली जात आहे. त्यामुळे दोन्ही गावांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन्ही गावांना भौतिक व सामाजिक सुविधा दिल्या पाहिजेत. तसेच करामध्ये नागरिकांना ५ ते १० टक्के सूट मिळालीच पाहिजे, असे हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत भाडळे यांनी सांगितले.
उरुळी देवाची येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा सोमवारी (ता.11) काढण्यात आला होता. पुढे ते म्हणाले, आमची गावे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून कर आकारणी व कर वसुली ही मोठ्या प्रमाणात झाली असून, ती आमच्यासाठी फार जाचक आहे. (जरी महानगरपालिकेच्या नियमात असेल तरी) परंतु, माझी व आम्हा ग्रामस्थांची आपणास विनंती आहे.
दरम्यान, यावेळी रस्त्यात खड्ड्डे की खड्ड्यात रस्ते, आता हे बस झाले. आमच्या मिळकतीचा कर कमी झालाच पाहिजे, कोण म्हणत देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. कचरा कुंडी आम्हाला, रोगराई आम्हाला, याचा आता पायबंद करा आणि आमच्या मागण्या बंद करा. कर घेऊन पालिका तुपाशी ग्रामस्थ मात्र उपाशी, आता सहन करणार नाही, अशा घोषणा देऊन यावेळी फ्लेक्सबाजी करण्यात आली होती.
महापालिकेत गावे समाविष्ट करताना जितकी कर आकारणी होती. त्याच्या दुप्पट कर आकारणी करून ती कर आकारणी कचरा डेपो पूर्णपणे बंद होत नाही. तोपर्यंत अथवा पुढील काही वर्ष कर आकारणी समांतर ठेवावी. गावातील मुख्य रस्ते दुरुस्त तथा पूर्णपणे नवीन स्वरूपात डांबरीकरण करून देण्यात यावे.
टँकरद्वारे गेल्या काही वर्षापासून पाणी पुरवठा होत होता, तो पाणीपुरवठा फार अपुऱ्या प्रमाणात आहे. तरी जोपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची बोजना पूर्ण होईपर्यंत, साधारणपणे जून २०२४ पर्यंत, आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे.
उरुळी देवाची, फुरसुंगी ही गावे २०१७ साली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. परंतु, तेव्हापासून गावातील ग्रामस्थांना प्राथमिक गरजा लाईट रस्ते पाणी या सुविधा पासून सुद्धा वंचित राहावं लागलं आहे. परंतु, आमच्या घर, व्यवसायाच्या ठिकाणांना कर आकारणी मात्र हडपसर, मगरपट्टा या भागातील करण्यात आली. एक तर आमची गावे गेल्या ३० वर्षापासून अधिककाळ पुणे महानगरपालिकेचा कचरा व त्याची दुर्गंधी रोगराई सहन करत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने समस्या मार्गी लावून देव्यात, अशा मागण्या केल्या आहेत.