दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. दौंड नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिक करू लागले आहेत.
शहरात जनावरांसाठी कोंडवाडा नसल्याने दौंड शहर व आजूबाजूच्या परिसरात मोकाट जनावरे दिवसरात्र रस्त्याच्या मध्यभागी बसलेली असतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. जनावरे शहरातील पोलिस स्टेशनसमोर, गोपाळवाडी रोड, सहकार चौक, भाजी मंडई, हुतात्मा चौक येथे रहदारीच्या वेळेस घोळका करून रस्त्याच्या मध्ये उभी असतात.
गाई, बैल, वळू, आणि भटके कुत्री हे शहरातील मुख्य रस्ते, बाजार पेठ, प्रशासकीय कार्यलाय, येथे वावर होत असल्याने शहरात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी तर जनावरे ही रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहन चालकाला वाहन चालवताना अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, ही जनावरे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र घाण करीत असल्याने दुर्गंधी पसरलेली असते. नगरपालिकेतील सफाई कामगारसुद्धा रस्त्यावर पडलेली ही घाण उचलण्याची तसदी घेत नाहीत. जनावरांमध्ये भांडणे जुंपलेली असतात. दौंड नगरपालिका प्रशासन यांनी मोकाट फिरणारे जनावरे यांचा बंदोबस्त करून जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.