हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पहाटे हवेत गारवा वाढला असून, दुपारी अचानक वाढलेली ऑक्टोबर हिट व दिवाळी खरेदीनिमित्त रस्त्यावरील वाढलेली गर्दी, अशा विविध कारणांमुळे पूर्व हवेलीत रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरणातील बदलाचा जनजीवनावर झपाट्याने परिणाम झाला आहे. त्यातून किरकोळ विकाराचे रुग्ण वाढल्याचे चित्र दिसून येत असून थंडी-तापाने घरोघर नागरिक फणफणत आहेत.
मागील आठ दिवसापासून वातावरणात झपाट्याने बदल झाला असून थंडीचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांत आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण वाढत असल्याने पूर्व हवेलीतील खाजगी रुग्णालयांत गर्दी दिसून येत आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करण्यावर नागरिक भर देत आहेत.
वातावरण बदलाचा परिणाम होत असल्याने व्हायरल फिव्हरचा जोर वाढला आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील गावागावात सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. पूर्व हवेलीतील खाजगी व ग्रामीण रुग्णालय हाऊस फुल्ल असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून, यापासून काळजी घेण्याची गरज आहे. मागील आठवडाभरापासून वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच आजाराच्या रुग्णांची सुध्दा सध्या शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरपूर पाणी प्या..!
हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या दिसून येतात. यात त्वचा कोरडी पडणे, खाज सुटू शकते. याशिवाय ओठही कोरडे पडतात. अशावेळी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय त्वचेला कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी त्वचेची स्वच्छता राखा, नियमितपणे आपले हात धुवा. सद्यस्थितीत ऊन, पाऊस, मधातच थंडी असा सतत बदल वातावरणात होत असल्यामुळे या वातावरणाचा फटका मानवी शरीरावर पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
याबाबत उरुळी कांचन येथील श्री गणराज हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. समीर ननावरे म्हणाले, “हिवाळ्यात दमा, सर्दी, फ्लू, सांधेदुखी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा समस्या जाणवत असल्यास दुखणे अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.”
याबाबत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप सोनवणे म्हणाले, “मागील आठ दिवसापासून वातावरणात झपाट्याने बदल झाला असून थंडी वाढली आहे. तसेच अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगी, चिकून गुणिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांनी ताप-थंडीची लक्षणे दिसताच आपल्या डॉक्टरांकडे जावे. वैद्यकीय चाचण्या करून तपासण्या करून घ्याव्यात.”