हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट व कासुर्डी (ता. दौंड) येथील टोलनाके मुदत संपल्याने मागील तीन वर्षापासून बंद आहेत. टोलनाके अद्याप उभेच असल्याने वाहतुकीस विनाकारण अडथळा ठरत असल्याने उभे असलेले टोलनाके त्वरित काढून टाकण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.
आर्यन टोलरोड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट व दौंड तालुक्यातील कासुर्डी या भागातील रस्त्याचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले होते. चौदा वर्ष या कंपनीकडून टोलवसुली सुरु होती. त्याची मुदत संपल्यावर येथील टोलवसुली बंद झाली. त्यास तीन वर्षाहून अधिक काळ झाला मात्र, अद्याप हे टोलनाके काढण्यात आलेले नाहीत.
टोलनाके बंद झाल्याने परिसरात पानटपऱ्या, छोटी-मोठी दुकाने, हॉटेल्स, यांची गर्दी तशीच राहिली आहे. तसेच टोलनाक्याचे कार्यालय व इतर सुविधांसाठी बांधण्यात आलेली रूम तशीच पडून आहे. टोलनाक्याच्या मार्गिकेमध्ये गतिरोधक आहेत. काही मार्गिकेमध्ये खड्डे पडले आहेत. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. या सर्व गोष्टींचा वाहतुकीला अडथळा कायम राहिला आहे. तो संबंधित विभागाने दूर करवा अशी वाहनचालक व प्रवाशांची मागणी केली आहे.
दरम्यान, बंद झालेल्या टोलनाक्याला लोकप्रतिनिधींसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर, तसेच नवीन शोरूम दुकानदारांनी शुभारंभाचे बॅनर टोलनाक्याला लावले जात आहेत. राजकीय पक्ष, संघटना, पदाधिकाऱ्यांच्या निवडी, तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी केली जात आहे. प्रत्येक चौकामध्ये लाईटच्या खांबांवर होर्डिंग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. स्ट्रीट लाईटच्या खांबाला छोटे होर्डिंग लावले जात आहेत. अशी होर्डिंग लावणारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
तृतीयपंथींकडून वसुली सुरूच..
टोलवसुली बंद झालेली असूनही टोलनाके तसेच उभे आहेत. या टोलनाक्यांच्या ठिकाणी गाड्यांचा वेग कमी होत असल्याने अनेक छोटे – मोठे व्यावसायिक, विक्रेत्यांनी आपली दुकाने येथे थाटली आहेत. टोलनाक्याजवळ पुणे बाजूस तर आता नियमीत मंडई सुरू झाली आहे. या टोलनाक्यावर तृतीयपंथींचे एक टोळके वाहनचालक व प्रवाशांकडून पैशे मागण्यासाठी सदैव तैनात असते. टोल कंपनीचा टोल बंद झाला तरी यांची टोलवसुली मात्र सुरू असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना कवडीपाट येथील अॅ्ड. राहुल झेंडे म्हणाले, “टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बूथमध्ये नागरिकांनी दिवस-रात्र अवैध धंदे सुरु केले आहेत. याकडे लोणी काळभोर पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. टोलनाका परिसरात उभारलेले कंपनीचे बूथ हे वैध कमी आणि अवैध स्वरुपात जास्त प्रमाणात सुरु आहे. तसेच टोलनाक्याच्या मार्गिकेमध्ये बनविण्यात आलेल्या गतिरोधकामुळे मोठी वाहने मोठ्या प्रमाणात आदळत असल्याने मोठा आवाज होत आहे. त्यामुळे या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.”