अजित जगताप :
सातारा : साताऱ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी ऐवजी शासकीय वेळेत चक्क मांसाहारी बिर्याणीचा बेत आखल्याने टिकेची झोड उडाली होती. त्यानंतर देखील सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिक्कारयांवर कारवाई न केल्याने येथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा तहसील कार्यालय आवारातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नागरिकांनी भेट दिली असता, तेथे कार्यालय प्रमुख सूर्यवंशी व अन्य शासकीय कर्मचारी, मुख्य दालनात मुख्य टेबलवर तंदूर – बिर्याणीवर ताव मारत असल्याचे दिसून आले. लगतच्याच टेबलवर मोठ्या पातेल्यातही बिर्याणी व जेवण्यासाठीचे पदार्थ होते.
नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी बेफिकीरपणे उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याबरोबरीने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी डोक्यावर हात मारून घेतला.
संबंधितांनी नागरिकांना शासकीय वेळेत ताटकळत ठेवून दालनात बिर्याणी सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. सरकारी कार्यातयात येणाऱ्या पक्षकारांकडून जेवण घेणे कितपत्त समर्थनीय आहे? याचा जिल्हा प्रशासनानेच त्वरित खुलासा करावा व संबंधितांना जाब विचारून चौकशी करावी, अशी मागणी जेष्ठ पत्रकार जयंत लंगडे, उमेश लेले, सत्यनारायण शेडगे, प्रमोद मोरे, शंकरराव कदम यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.
दरम्यान,दुष्काळी भागातील एका राजकीय पक्षाचे नेते यावेळी त्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी मौन धारण केल्याने संबधित अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयात बिर्याणी खाण्याचे धाडस केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या प्रकरणी जिल्हा महसूल यंत्रणा बोटचेपेपणाची भूमिका पार पाडत असेल तर तीव्र आंदोलन करण्यासाठी नागरिक तयार झाले असल्याची माहिती हाती आली आहे.