China New Virus : नवी दिल्ली : चीनमधून प्रसारीत झालेला कोरोना अद्याप पूर्णपणे संपला नाही, तोपर्यंतच चीनमधील आणखी एका विषाणूने भारतात एन्ट्री केली आहे. चीनमध्ये काही दिवसांपासून थैमान घातलेल्या मायक्रोप्लाजमा न्यूमोनिया या बॅक्टेरियाची लागण झालेले सात रुग्ण दिल्लीतील एम्समध्ये दाखल झाले होते असं स्पष्ट झालं आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळामध्ये असे सात रुग्ण आढळल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.
एम्सने पीसीआर आणि आयजीएम एलिसा या दोन चाचण्यांच्या माध्यमातून या सात प्रकरणांचा शोध लावला. या चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 3 आणि 16 टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमधील न्यूमोनियाच्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्यांना चीनमधील विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामुळे आता देशभरात अशा चाचण्या वाढवण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये थैमान
चीन आणि काही युरोपियन देशांमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो आहे. याला ‘वॉकिंग न्यूमोनिया’ असं नावही देण्यात आलं आहे. हा विषाणू मुख्यत्वे लहान मुलांना टार्गेट करत असल्यामुळे चिंता जास्त वाढली आहे.
काय आहेत लक्षणं?
चीनमध्ये प्रसार होत असणाऱ्या या विषाणूची लागण झाल्यानंतर अगदी सामान्य न्यूमोनियाचीच लक्षणे दिसतात. घसा खराब होणे, थकवा जाणवणे, ताप येणे, दीर्घकाळ खोकला राहणे आणि डोकेदुखी अशा लक्षणांचा यात समावेश आहे.