मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना महिन्याला ३.४ लाख वेतन मिळणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता ३.४ लाख रुपये प्रति महिना झाले आहे. राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत. यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत दिल्या जात आहेत.
तेलंगणा, हरियाणा-बिहारसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ४.१० लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३.९० लाख रुपये मिळतात. तसेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना २.८८ लाख रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २.५५ लाख रुपये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना २.२० लाख रुपये, २.१५ रुपये देण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा २.१० लाख रुपये मिळतात. तर सर्वाधिक वेतन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला तरूण वयातच सुरुवात झाली. अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सर्वात तरूण महापौर बनले. त्यानंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं आहे. 2014 ला वयाच्या 44 व्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2019 ला अजित पवारांसोबत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अवघ्या काही तासात हे सरकार कोसळलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.