मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघनखं ही भारतात आणणार असल्याच काही दिवसांपूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ही वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तसं झालं नाही. त्याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना खोचक सवाल विचारला आहे. “नोव्हेंबर गेला, जानेवारी पण हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?” असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारला जमलं नसेल असं काम, या सरकारने केलं आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते . 16 नोव्हेंबरपर्यंत ही वाघनखं महाराष्ट्रात येतील. असा दावा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. राज्य सरकारने लंडनमधील म्युझियमशी करार केला आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वतः लंडनमध्ये गेले होते.
विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सुधीर मुनगंटीवारांना खोचक सवाल विचारला आहे. “थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला. वर्ष संपले, 2024 उजाडले, आता जानेवारी पण हुकला! वाघनखं काही आली नाही. आता परत लंडनवारी करणार की, पुढची तारीख देणार?” असं विजय वडेट्टीवार म्हटलं आहेत.