दौलताबाद : दौलताबाद येथील घाटात खुलताबादकडे प्रवासासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सहलीची बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे अपघात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोखंडी सावरगाव आंबाजोगाई येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी घेऊन एसटी महामंडळाची बस शनिवारी बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला पाहून खुलताबाद येथील भक्त निवासात थांबण्यासाठी जात होती. मात्र, दौलताबाद घाटात समोरून येणाऱ्या दुचाकी धारकांनी बसला हुलकावणी दिली. यामुळे दुचाकीधारकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस रोडच्या कडेला असलेल्या एका नालीत उतरली.
चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने बस त्वरित थांबली. यामुळे किरकोळ मार वगळता सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. यामुळे काही वेळ घाटात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरा पर्यंत बस बाहेर काढण्याचे व घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस करत होते.