छत्रपती संभाजीनगर : ससरत्या वर्षाला रामाराम करताना आणि नव्या वर्षाच स्वागत करताना, सर्वांचा ओढा हा पार्टी, मस्ती-मज्जा करण्याकडे असतो. पार्ट्यांसोबत चिकन, मटणाच्या विविध डिशवर ताव मारणे अजच्या जनरेशनला आवडते. संभाजीनगरमध्ये यंदा चिकन, मटण, माशांची टनाने विक्री होत आहे. तिप्पट, चौपटीने नॉनवेज जेवणाच्या ऑर्डर हॉटेल व्यवसायीकांना मिळतायत.
रविवार आणि थर्टी फर्स्ट असे सुटीचे समीकरण आल्याने अनेकांनी हॉटेल, घर, ढाबे, शेतात पार्टी प्लॅन केली आहे. गेल्या २ दिवसांपासून ढाब्यांवर गर्दी वाढली आहे. चिकन, मटण, मासे महागडे झाले तरी विक्रेत्यांकडे हॉटेल, ढाबे मालकांनी तिप्पट, चौपट ऑर्डर दिल्याने थर्टी फर्स्टच्या दिवशी चिकनची (जिवंत कोंबड्या) जिल्ह्यात ६० ते ७० टनापर्यंत विक्री होण्याचा अंदाज आहे. मटण विक्रेत्यांनी शेकडो बोकडांची आठवडाभरापूर्वीच खरेदी केली आहे.
थर्टी फर्स्टसाठी हॉटेल, ढाबे चालकांकडून दुप्पट मागणी असल्याने ही विक्री ६० ते ७० टनांपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे. चिकन सध्या २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. होलसेलमध्ये विक्रेत्यांना जिवंत कोंबडी ९० रुपये किलो दराने मिळत आहे तर रिटेलमध्ये ती १३० रुपयांना विक्री होत आहे. फक्त चिकन विकत घ्यायचे असल्यास ते २०० रुपये किलो आहे. मार्केटमध्ये गावरान कोंबडे मिळणे अवघड असून, एक गावरान कोंबडा ५०० ते ६०० रुपयांना मिळतो. त्यामुळे डुप्लिकेट गावरानची विक्री होताना दिसून येते. शहरातील प्रत्येक चिकन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची खरेदी करून ठेवली आहे. गटारीनंतर हा मोठा सिझन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रात्री राहणार पोलिस तैनात
नवीन वर्षाच्या जल्लोषात शहराच्या शांततेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. बंदोबस्तात परिमंडळ १, २ आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, ६३ फिक्स पॉइंटवर नजर ठेवणार आहेत. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी ६ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यासह ८५३ पोलिस कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथूनही सुमारे सातशे कॅमेरे शहरात आहेत. त्याद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
वाहनधारकांची ब्रिथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. काहीजण फटाके फोडून जल्लोष करतात. अतिउत्साहींमुळे अपघात घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तगडा बंदोबस्त राहणार आहे.