मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. छगन भुजबळ हे राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहिले नाहीत. यानंतर छगन भुजबळ हे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात होतं. त्यातच आता छगन भुजबळ यांनी नुकतंच सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान समीर भुजबळ हेही तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान छगन भुजबळ हे कोणता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडलं? आता काय सुरू आहे याबाबत बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलंय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. ओबीसींनी यावेळेस महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे, असे त्यांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. “मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.