अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असं महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात असताना राहुरी विधानसभा मतदारसंघातुन एक धक्कादायक बातमीत समोर अली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे कर्डिले विजयी झाले. याच विजयाच्या जल्लोषातून राहुरीतील गुंजाळे गावात धुमश्चक्री झालेली दिसून आली. या हाणामाऱ्यांमध्ये गोळीबार झाला. तसेच एकमेकांविरोधात कुऱ्हाडी सुद्धा चालवण्यात आल्या आहेत. राहुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
राहुरीतील गुंजाळे गावात भाजपचे कर्डिले समर्थकांकडून मोठा जल्लोष सुरू होता. फटाके फोडले जात होते. यातून राहुरी गुंजाळे गावातील बसस्थानक चौकात कर्डिले-तनपुरे समर्थक असलेले संजय नवले आणि बाबा चेडवाल एकमेकांविरोधात भिडले. यात एका कार्यकर्त्याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याने भाऊसाहेब नवले यांच्या पायाला गोळी लागली.तसेच नवले आणि चेडवाल यांनी हाणामाऱ्यांमध्ये एकमेकांविरोधात कुऱ्हाडीचा वापर केला.
धुमश्चक्रीमध्ये चौघे गंभीर..
या धुमश्चक्रीमध्ये चौघे गंभीर झाले असल्याची माहिती मिळत आहे.या प्रकरणी राहुरी पोलिसांकडे परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. संजय शिवाजी नवले, त्याचा भाऊ भाऊसाहेब नवले, बाबा चेडवाल आणि सोन्याबापू चेडवाल जखमी झाले आहेत. भाऊसाहेब नवले याच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच कुऱ्हाडीने मार लागल्याने काही जण जखमी झाले आहेत. या जखमींवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नवले आणि चेडवाल यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याची माहिती राहुरी पाोलिसांना कळताच, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे अतिरीक्त बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिस्थिती नियंत्रण मिळवण्यात यश आलं.