शिरूर : टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मीना शाखा कालव्याच्या चौफुला पाणी वापर संस्था अंतर्गत चारी दुरुस्तीचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम बुधवारी (दि ४) सुरू करण्यात आले. जलसंपदा विभाग आणि पाणी वापर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चारीतील झाडे झुडपे, काढून आतील कचरा आणि माती काढून टाकण्यात येत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पाणी येथील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
कालवा तयार झाल्यापासून या चारीला पाणी आलेले नाही त्यामुळे ही चारी दुरुस्त करण्यासाठी पाणी वापर संस्थेकडून जलसंपदा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. यासाठी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे आणि पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोखंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली होती.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता दत्तात्रय कोकणे, उपविभागीय अधिकारीआर.जी.हांडे यांनी दखल घेत सदर कामास मंजुरी दिल्याने पाणी वापर संस्थेने सदर काम सुरू केले. या कामाची प्रत्यक्ष पाहणी टाकळी हाजीचे सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे, कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी केली. यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोखंडे, मारुती नरवडे, शहाजी पवळे, सुरेश पाराठे, वि.का.सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे आदी शेतकरी उपस्थित होते.
भविष्यात पाणी हा विषय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे मीना कालव्याचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पाणी वापर संस्थांनी चाऱ्यांची दुरुस्ती करून घ्यावी .तसेच सर्वांनी पाणी पट्टी भरावी असे आवाहन कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी केले.