Sanjay Raut : सोलापूर : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर काल चप्पल भिरकावण्यात आली होती. त्यातच आता सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. गोपीचंद पडळकर यांच्यासोबत झालेल्या या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली होती. त्यात आज अशीच दुसरी घटना घडली. धनगर समाजाने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेधही नोंदवला. संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकणाऱ्याने नारायण राणे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असूनही संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमक काय घडलं?
या कार्यक्रमाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून संजय राऊत निघाले होते. राऊत बाहेर पडले. गाडीत बसले. त्यांची गाडी काही अंतरावर गेली. गर्दी असल्याने गाडीचा स्पीड कमी होता. इतक्यात गाडीच्या टपावर काही तरी वाजल्याचा आवाज झाला अन् सर्वच अलर्ट झाले. गाडीच्या टपावर एक पिशवी पडली होती. या पिशवीत पाच ते सहा चपलांचे जोड होते. राऊत यांच्या दिशेने या चपला भिरकावण्यात आल्या होत्या. चप्पल भिरकावल्यानंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा देत एक तरुण गर्दीतून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय राऊत हे सुखरुप आहेत. त्यांना काहीही झालं नसल्याचं सांगण्यात आलं.
सोलापूर दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी सोलापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवसैनिकांशी संवाद साधला. मीडियाशीही संवाद साधला. संध्याकाळी त्यांचा मुख्य आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यामुळे राऊत थांबले होते. संध्याकाळी ते कार्यक्रम स्थळी आले. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर राऊत यांनी या ठिकाणी तडाखेबंद भाषणही दिलं.