मंगरुळपीर (वाशीम): मागील काही दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलाने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. कधी थंडीचा कडाका, कधी दाट धुके, तर कधी ढगाळ वातावरणाचा पिकावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याच्या भितीने शेतकरी चिंतित झाला आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह संत्रा फळबागांवर याचा परिणाम होत असून, पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किडीच्या ‘बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. तसेच खरिप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून, तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरीची सोंगणी सुरू आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल झाल्याने हाताशी आलेले हे पीक हातचे जाते की, काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिके बहरली असून, हरभऱ्याचे पीक फुलधारणा तसेच घाट्याच्या अवस्थेत आहे. मांत्र, सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे, पिकांवर अळ्यांचा व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे यंदा गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच संत्राच्या फळबागाही बहरलेल्या असून, ढगाळ वातावरणाचा त्यावरही परिणाम होताना दिसत आहे.