मुंबई: महाराष्ट्रातील भाजपच्या अभूतपूर्व यशाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करून अभिनंदन आणि कौतुक केले. देशभरातील सर्व राज्यांच्या प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटन मंत्री व प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यांच्या वतीने हे अभिनंदन करण्यात येत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेला नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात सुरुवात झाली. त्यासाठी बावनकुळे हे दिल्लीत पोहोचले आहेत. त्यावेळी महाराष्ट्रातील भाजप व महायुतीच्या विजयाबद्दल बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला. यासंदर्भात बावनकुळे म्हणाले, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे; पण पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे, अशी भावना व्यक्त करून आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकत्यांना अर्पण करतो, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानाची माहिती देऊन नियोजनाची मांडणी केली.