जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवास सोमवार (दि. २) पासून सुरुवात होत आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान जेजुरी व श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या वतीने चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २) या उत्सवाला प्रारंभ होत असून जेजुरी गडावर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी (दि. ३) मार्तंड विजय ग्रंथ पारायण, बुधवारी (दि. ४) पारायण व मल्हारी सहस्र नाम याग, गुरुवारी (दि. ५) पारायण तसेच देवाची देव दिवाळी, अन्नकोट, शुक्रवारी (दि. ६) तेलहंडा, देवाला तेलवन व देवाला हळद लावण्याचा धार्षिक विधी होणार आहे.
शनिवारी (दि. ७) चंपाषष्ठी उपासनेची सांगता होणार असून या वेळी वांग्याचे भरीत, तसेच मिष्टान्न महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात सहा दिवस जेजुरी गडावर वाघ्या मुरुळींचा जागर तसेच अत्रदान करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे गणेश आगलावे आणि प्रशांत सातभाई यांनी सांगितले.