पुणे : वर्षअखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यतेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे, हे या निर्बंधांचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने या निर्बंधांमधून विशेष सूट देण्यात येत आहे. वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.