नाशिकः नाशिक-डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्हा आणखी एका रेल्वे मार्गाने जोडला जाऊन कृषी, उद्योग क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक व कृषी क्षेत्राच्या दृष्टीने विशेष असे महत्त्व आहे. त्यादृष्टीने भारत-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक – त्र्यंबकेश्वर वाणगाव वाढवण पोर्ट बीजी रेल्वेला मंजुरी देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवण बंदराला राज्य आणि केंद्र शासनाने मंजुरी दिली होती. या बंदराचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या बंदराला जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाशिक- डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक ते डहाणू रेल्वेमार्गाच्या १०० किलोमीटरच्या या लाइनमुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होणार आहे, तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हा प्रकल्प अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीसारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना या रेल्वे मार्गामुळे सहज पोहोचता येणे शक्य होणार असून, प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे. विशेषतः नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतमाल वाढवण बंदरापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे, तसेच शेतमालासह सर्व प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांच्या आयात-निर्यातीस चालना मिळून राज्याच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे.