लहू चव्हाण
पाचगणी : टेबल लॅंन्ड पठारावरील व्यावसायिकांच्या उपजीविकेचा विचार करून पठाराकडे जाणाऱा नव्याने तयार करण्यात आलेला सिमेंट काॅक्रीट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, अनिल रांजणे, राजेश बगाडे, राहूल बगाडे यांच्या हस्ते रस्त्याचे पुजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, स्थापत्य अभियंता निखिल पवार, नगर अभियंता मुकुंद जोशी, अलाइड सिक्युरिटीचे व्ही. जी. शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या टेबल लॅंन्ड पठार पाॅंईटच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.त्यामुळे अनेकवेळा पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.या पठाराकडे जाणारा सुमारे सातशे मीटर लांबीचा हा रस्ता ट्रिमिक्स काॅक्रीट पध्दतीने केला असून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.या सिमेंट काॅक्रीट रस्त्यामुळे टेबल लॅंन्ड पठाराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
दरम्यान, हा रस्ता वेळेत पूर्ण करुन घेतल्याबद्दल टेबल लॅंन्ड पठारावरील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचे आभार मानले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नामदेव चोपडे म्हणाले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या अथक परिश्रमाने या सिमेंट काॅक्रिट रस्त्याचे कमीतकमी वेळेत दर्जेदार काम झाले आहे.