अजित जगताप
वडूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय किसान संघाचा वर्धापन दिन वडूज ता. खटाव येथे शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळीला बळीराम यांच्या प्रतिमेचे औक्षण व पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला किसान संघाचे प्रमुख मार्गदर्शक खंडेराव कुलकर्णी, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश शहा, नंदकुमार खराडे ,सौ. सरिता मांडवे, विनायक ठिगळे, भालचंद्र इनामदार, नामदेवराव राऊत, अमर फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी लागणाऱ्या वस्तूंवर जी.एस.टी.राज्य व केंद्र सरकारने माफ करावे. शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये अनुदानाऐवजी २५ हजार रुपये अनुदान करावे. अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी भारतीय किसान संघ आंदोलन करत आहे १९६५ साली जय जवान…. जय किसान… असा जयघोष माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता.
सध्या जय जवानांचा प्रश्न सुटला असला तरी जय किसान यांचा प्रश्न सुटलेला नाही. सध्या भारत देश प्रगतीमध्ये पाचवा क्रमांकावर आहे. १९९१ साली तात्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीमध्ये भारताने ४८ टन सोने लंडनला गहाण ठेवले होते. त्यानंतर २००८ पासून काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विकासाचे पर्व सुरू केले होते. अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
भारतीय किसान संघ ( बीकेएस ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न एक भारतीय शेतकऱ्यांची प्रतिनिधी संस्था आणि संघ परिवाराची सदस्य आहे. या संस्थेचे जवळपास तीस लाख सभासद आहेत. भारतातील सर्व राज्यांमध्ये शाखा आहेत. मार्च २००५ रोजी, भारतीय किसान संघाने भारत सरकारकडे कृषी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे २० अब्ज रुपयाचा फंड स्थापन करण्याची मागणी केली. २००७ मध्ये बीकेएसने गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारवर नाराजी दर्शविली आणि त्यावेळच्या कापसाच्या किंमतींबाबत असमाधानी असल्यामुळे सौराष्ट्रात शेतकरी आंदोलन केले होते.