गडचिरोली : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. असेच काहीस चित्र गडचिरोली जिल्यामध्ये दिसून येत आहे. पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्या किती बिकट असते; याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्ते नसल्याने येथे नेहमीच खूप समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्य सेवा देखील पोहचू शकत नसल्याने रुग्णांना पायपीट करत यावे लागत असते. त्यामुळे गरोदर महिलेला उपचारासाठी नेण्यासाठी खाटेवर घेऊन तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे धक्कदायक चित्र जिल्ह्यात पुन्हा एकदा बघायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून पासुन २० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे केरामीटोला येथील गरोदर महिला रोशनी शामसाय कमरो हिला खाटेवर उचलून तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करत रुग्णालय गाठावे लागले. त्या महिलेला आधी चरविदंड येथे नेण्यात आले. मात्र रस्ता नसल्यामुळे पाण्याने भरलेला नाला पार करावा लागला. चरविदंड येथून एका खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे तपासणी करून गडचिरोलीला रेफर करावे लागले.
आरोग्य, रस्त्यांचा प्रश्न कधी सुटेल?
या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून. हे प्रश्न कधी सुटतील याची प्रतीक्षा आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात रस्त्या अभावी नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.