मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या आसपास रविवारी रात्री ही अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवसेना खासदार रवींद्र वायकर हे रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन जात होते. यावेळी यांच्या कारला जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेश द्वाराजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी मोठ्या संख्येने पोहचले. धक्कादायक बाब म्हणजे अपघातास कारणीभूत असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे. दारुच्या नशेत कार चालवल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
अपघातावेळी रवींद्र वायकर हे गाडीत होते. सध्या ते सुखरूप आहेत. रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा तपास करत आहे.