मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. आता मात्र, यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
२६ जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी दिली आहे. ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश केला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी या निर्देशाची ठोस अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले आहेत.