नवी दिल्ली : देशात प्रत्येक पाचपैकी एका अर्भकाचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सिझेरियन पद्धतीने होत असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. सरकारी आरोग्य केंद्राच्या तुलनेत खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षणही या अभ्यासातून संशोधकांनी नोंदविले आहे.
राजधानी दिल्ली स्थित ‘जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या संशोधकांनी यासंबंधीचे महत्त्वाचे संशोधन केले आहे. यात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (२०१९ ते २०२१) च्या पाचव्या टप्प्यातील आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे. २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशांतील १५-४९ वर्ष वयोगटातील ७.२ लाखांहून अधिक महिलांच्या सर्वेक्षणाचा यामध्ये समावेश आहे. अभ्यासानुसार विविध राज्यांत ‘सिझेरियन’ तथा ‘सी-सेक्शन’ शस्त्रक्रियेच्या प्रमाणात भिन्नता आढळून आली. नागालँडमध्ये सिझेरियनचे प्रमाण ५.२ टक्के तर तेलंगणात हे प्रमाण ६०.७ टक्के इतके नोंदवण्यात आले.
देशातील प्रत्येक पाचपैकी एका बाळाचा जन्म सिझेरियन पद्धतीने होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. सरकारी आरोग्य केंद्राच्या तुलनेत खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियनचे प्रमाण अधिक असल्याचा दावा अभ्यासातून करण्यात आला आहे. यासंबंधीचे सविस्तर संशोधन ‘द लँसेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट आशिया जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.