अजित जगताप
वडूज : शेतकऱ्यांच्यामुळे आपल्याला दोन वेळचे जेवण मिळते आणि ही जेवण बनवण्याची कामगिरी शेतकरी महिला करत असतात. त्यामुळे महिलांनी शेतात कष्ट करून तयार केलेला कोबी हा महिला बचत गटाने वाण देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे असे प्रतिपादन वडूज नगरीचे नगरसेवक बालाजी पाटोळे यांनी वडूज (ता. खटाव) येथे महिला बचत गटाच्या साहित्य प्रदर्शन उदघाटन प्रसंगी केले.
या वेळेला सामाजिक कार्यकर्त्या वनिता गुजर सुनीता गोडसे व नगरसेविका शोभा वायदंडे रेश्मा बनसोडे, स्वप्नाली गोडसे, पत्रकार नितीन राऊत, अजित जगताप व यशवंत मध्यवर्ती कार्यालयाचे राऊत बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्ये सणाला खूप महत्त्व आहे. बहुतेक सण हे महिलांची निगडित असल्यामुळे सर्वाधिक उत्साह हा माता-भगिनींना होत असतो. याची जाण ठेवून वडूज ता खटाव येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतातील कोबी वाण म्हणून देऊन शेतकऱ्यांची काळजी केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले जात आहे.
अलीकडच्या काळामध्ये हळदीकुंकू समारंभ मकर संक्रात या सणाच्या दिवशी अनेक माता-भगिनी एकमेकींना शुभेच्छा व वाण देऊन हा सण साजरा करतात. परंतु शेती पिकवणारा शेतकरी हा काबड कष्ट करतो. परिश्रम करतो. पण, त्यांना तेवढा मोबदला मिळत नाही.
याची जाणीव ठेवून ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिला कार्यकर्त्या गुजर व गोडसे यांच्या संकल्पनेतून वाकेश्वर (ता. खटाव) येथील शेतकरी राऊत यांच्या शेतातील कोबी विकत घेऊन तो वाण म्हणून दिला.
सुमारे एक हजार कोबीचा गड्डा हा वाण म्हणून त्यांनी वाटप केल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचे साधन मिळालेले आहे.तसेच महिलांनाही वाण मिळाला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांना आधाराची भावना निर्माण झालेली आहे. या उपक्रमासाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.
दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम राबविण्यात येतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.