लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील प्रसिद्ध सनदी लेखापाल (सी.ए.) मच्छिंद्र संतराम कामठे (वय-62) यांचे आज मंगळवारी (ता. 16) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. फुरसुंगी गावातील पहिला सनदी लेखापाल हरपल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
मच्छिंद्र कामठे यांची मागील काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मच्छिंद्र कामठे यांची मृत्युशी सुरु असलेली झुंज आज अपयशी ठरली. आणि त्यांचे आज सकाळी सात वाजता उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मच्छिंद्र कामठे हे उत्कृष्ट सनदी लेखापाल म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले. मुलगी प्रतीक्षा कामठे हिने सुद्धा आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सनदी लेखापालाची उच्च पदवी घेतली आहे. तर मुलगा ओमकार हा उद्योजक आहे. तसेच त्यांचा पुतण्या आकाश कामठे हा सुद्धा सनदी लेखापाल आहे. उरुळी कांचनचे माजी सरपंच युवराज कांचन यांचे ते मामा होत.
दरम्यान, मच्छिंद्र कामठे यांच्या पार्थिवावर फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावरील राहत्या घरी आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.