लोणी काळभोर : हवेली तहसील कार्यालयातील खातेदारांच्या नावातील चुक दुरुस्ती आदेशाला पन्नास दिवस पुर्ण होऊनही संबंधित तलाठ्याने आदेशाची नोंद न घेतल्याने सेवा हमी कायद्याचे नियम पायदळी तुडवले आहेत. हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या आदेशाला संबंधित तलाठ्याने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तलाठी कार्यालय, चहा पेक्षा किटली गरम, अशी वेळ सद्या म्हणण्याची आलेली आहे.
लोणी काळभोर येथील गट नंबर २/४ या मिळकतीवरील ईतर हक्कातील खातेदारांच्या नावातील दुरुस्तीबाबत हवेली तहसील कार्यालयाने तातडीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा १९६६ कलम १५५ अन्वये प्रस्तुतच्या नावातील दुरुस्तीबाबत आरटीएस/१५५/एस आर/३१९/२०२२ दि२४/८/२२ रोजी आदेश पारित केलेला आहे.मात्र हा आदेश होऊनही पन्नास दिवस पुर्ण झाले तरीही आदेशाची दखल तलाठ्याने घेतलेली नाही. तसेच हवेली तहसील कार्यालयातून पारित केलेल्या आदेशाची तलाठी कार्यालय नोंद घेत नसल्याने संबधिताची कार्यतत्परता दिसून येत आहे.
याबाबत बोलताना हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते म्हणाल्या कि, हवेली तहसील कार्यालयातून पारित होणा-या सर्व आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
भाजपचे सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे म्हणाले कि, लोणी काळभोर येथील तलाठीच कार्यालयीन वेळेत सजामध्ये उपस्थित राहत नाही. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे सुरुच असतात. संबधित तलाठ्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे नोंदणीकृत व अनोंदणीकृत ई म्युटेशन फेरफार नोंदी ह्या सेवा हमी कायद्यात घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार आहोत.
लोणी काळभोर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवाजी काळभोर म्हणाले कि, तलाठी कार्यालयात तलाठी भेटतच नाही. त्यामुळे कार्यालयीन कामे खोळंबल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात.