लोणी काळभोर : स्टॉक व शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी फुरसुंगी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाला सुमारे 50 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यावसायिकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. 6) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 21 डिसेंबर 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 या महिन्यांच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एक व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या मोबाईलवर जेसिका व कपील नामक दोन व्यक्तीचा मेसेज आला. स्टॉक व शेअर ट्रेडिंगमार्फत जादा नफा मिळवून देतो. असे लिहिले होते. या अमिषाला फिर्यादी बळी पडले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांनी आत्तापर्यंत 49 लाख 55 हजार 500 रुपये सायबर चोरट्यांच्या खात्यात पाठविले आहेत. मात्र अद्यापपर्यंत फिर्यादी यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत दोन्ही सायबर चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे करीत आहेत.