पुणे : पुण्यातील नर्हे परिसरात एका व्यावसायिकाने ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. ओळखीच्या महिलेला मोबाइलवर केलेल्या मेसेजच्या आधारे संबंधित महिला आणि तिच्या पतीने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून १३ लाख रुपये उकळले. तसेच आणखी पैशाची मागणी संबंधित दाम्पत्य करत होते. या त्रासाला कंटाळून अखेर व्यावसायिकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अशाेक जाेशी (३८, रा. नऱ्हे, पुणे) असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याबाबत गाेपाल कांजी भाई जाेशी (३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून वैष्णवी गणेश चव्हाण (२६) आणि गणेश चव्हाण (२८, दाेघे रा. खैरेवाडी, विद्यापीठ राेड) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या काळात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार गाेपाल जाेशी यांचा भाऊ मयत अशाेक जाेशी याने वैष्णवी चव्हाण यांच्या व्हाॅट्सअपवर मेसेज पाठवला हाेता. त्या मेसेजच्या निमित्ताने महिलेने अशोक जोशी यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याची वारंवार धमकी दिली. तसेच संबंधित आराेपी दाम्पत्याने मयत अशाेक यांना ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने १३ लाख रुपये घेतले.
मात्र, त्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा एकदा अशाेक याच्या ऑफिसवर जात त्यांना पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत पुन्हा ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी केली. अखेर अशोक यांनी या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्रश्न करून आपलं जीवन संपवलं. अशी फिर्याद जोशी यांनी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.