पुणे: व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी रविवारी (दि. १) समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय रमेश जाधव (रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार व्यावसायिकाची एका परिचितामार्फत आरोपी जाधव याच्याशी ओळख झाली होती.
या व्यावसायिकाला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. जाधव याने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेकडून १५ दिवसांत चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखविले. त्याबाबत या व्यावसायिकाशी मुद्रांकावर करारनामा केला. कर्ज मंजुरीसाठी त्याने या व्यावसायिकाकडून वेळोवेळी सहा लाख ८७ हजार रुपये उकळले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. त्याबाबत व्यावसायिकाने त्याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, जाधव याने टाळाटाळ सुरू केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.