सोलापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पेटला असल्याने दोन्ही राज्याच्या एसटी बसेस महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपर्यंतच धावत असल्याची माहिती सोलापूर एसटी डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली.
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस शुक्रवारी सायंकाळी सीमेवर अडविल्या होत्या. त्या बसेस गुलबर्गा येथे जात होत्या. कर्नाटक पोलिसांनी या सर्व बसेस अक्कलकोट डेपोकडे परत पाठवल्या. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एसटी महामंडळच्या बसेस फक्त सीमेपर्यंत प्रवासी घेऊन जात आहेत. कर्नाटकच्या बसेस देखील सोलापुरात आल्या नाहीत. आंदोलकांकडून बसेसना लक्ष्य करण्यात येत असल्याने दोन्ही राज्यांकडून बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावादाचा फटका आता एसटीच्या प्रवाशांना बसतो आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी आणि इतर वाहनांना विरोध केला जात आहे. तिथे असुरक्षिता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस अक्कलकोटच्या सीमाभागात रोखल्या. शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी पाच ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकूण पाच गाड्यांना कर्नाटकात जाण्यास रोखण्यात आले. कर्नाटक पोलीस कर्नाटकाच्या बसेस सीमेवरून परत गुलबर्गा, आळंद, विजयपूरकडे परत पाठवत आहेत.
कर्नाटक हद्दीत कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी महामंडळ प्रशासनाने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले आणि सीमेपासून परत अक्कलकोट आगारकडे बसेस निघाल्या. बसमधील प्रवासी खासगी जीपने गुलबर्ग्याकडे रवाना झाले.
दरम्यान, सोलापूर-गुलबर्गा मार्गावरील हिरोळी सीमेजवळ तीन गाड्या तसेच दुधनीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन गाड्या कर्नाटक पोलिसांनी रोखल्या. साधारण ८२ प्रवाशांची गैरसोय झाली. या घटना घडल्यानंतर एसटीचे अधिकारी सतर्क झाले आहेत. कनार्टकमधील परिस्थिती पाहून सोलापुरातून आज गाड्या रवाना होतील, अशी माहिती दत्तात्रय कुलकर्णी (डेपो व्यवस्थापक, सोलापूर आगार) यांनी दिली.