पुणे : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा याच्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा उद्या बुधवार (ता.६) पासून पूर्ववत होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संप घेतला होता. त्या कालावधीत प्रवास्यांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने नव्याने बससेवा सुरु केली होती. मात्र ग्रामीण भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस मार्गांच्या संचालनासाठी येत असलेल्या खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२ मार्गावरील बससेवा शनिवार (ता.३) पासून बंद केली होती. बससेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी, पर्यटक व भाविक भक्तांचे हाल मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे बससेवा पूर्वरत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली होती.
याबाबत बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, पीएमपीएमएल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून आम्ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना याबाबत माहिती देत ही सेवा सुरू होणे गरजेचे आहे अशी मागणी केली.
त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही नागरिकांच्या या समस्येची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना आज (दि.५) रोजी सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.