दौंड : दौंड शहरातील भवानीनगर येथे एका घरातून चोरट्याने 7 लाख 20 हजार रुपये किंमतीचे तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत वैशाली संदिप वाघमोडे (रा. भवानीनगर, ता. दौंड, जि. पुणे) यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चैतन्य संजय शिंदे (वय-22, रा. दोरगेवाडी, यवत, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली वाघमोडे यांच्या घरातून चोरट्याने तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने घरफोडी करून लंपास केले होते. त्यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण व पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला होता.
दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी या गुन्ह्यामध्ये आरोपी चैतन्य शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असता तपासामध्ये आरोपीकडून चोरी गेलेले 7 लाख 20 हजार रुपये किंमतीचे तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण, सहा. पोलीस फौजदार पांडुरंग थोरात, पोलिस हवालदार एस.डी गुजर, नितीन बोराडे निखिल जाधव, अमीर शेख, पांढरे, पो. कॉ. संजय कोठावळे, पवन माने या पथकाने केली.