मुंबई: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेरील भिंतीवर टोकदार काटेरी तारही लावण्यात येत आहे. त्याचबरोबर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. अत्याधुनिक सुरक्षा उपकरणं तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा चौकी देखील तयार केली आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीला बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईगँग कडून सलमान खानला अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याच्या गॅलेक्स अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबारसुद्धा केला होता. त्यातील एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीच्या भिंतीला लागली होती. आता सुरक्षेचा बंदोबस्त म्हणून या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. दरवर्षी ईद, दिवाळी आणि वाढदिवशी सलमान खान या बाल्कनीत उभं राहून चाहत्यांना अभिवादन करत असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सीसमोर मोठी गर्दी करत असतात. मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे गॅलेक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. त्याच बरोबर घराच्या खिडक्यांनाही बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.
जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार..
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईन याने स्वीकारली होती. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा’, अशी धमकी बिष्णोईने फेसबुकवरील पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वांद्रे इथल्या सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे.
आता गॅलेक्सी अपार्टमेंट्स कॉम्प्लेकच्या बाहेरील परिसरात अनधिकृत व्यक्ती आणि चाहत्यांच्या जमावास बंदी घालण्यात आली आहे. सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये आठ ते दहा सशस्त्र पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सलमानला कुठेही जायचं असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय साधून तो परिसर आधी सुरक्षित केला जातो.