बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.
अजित पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरूअसलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवसृष्टीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घ्यावी. शिवसृष्टीचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना हेवा वाटेल, असे कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षाची लागवड करुन संपूर्ण परिसर हिरवेगार राहील, असे नियोजन करावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी,याकरीता आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
प्रवेशद्वाराला वनोद्यानाशी सुसंगत रंगरंगोटी करावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने तसेच चढतांना-उतरतांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पायऱ्याची व बैठक व्यवस्था करावी. तलावात नौकाविहार सुरु करावे. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाची कामे करताना दर्जेदार, टिकाऊ फरश्या बसवाव्यात. भिंती, फरशांमधील फटी राहता कामा नये. महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या बसवाव्यात. विकासकामे करताना कॅनलच्या भिंतीला अडथळा निर्माण होणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.