मुंबई : राज्यातील शिंदे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीसाठी हे अर्थ संकल्पिय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असून याद्वारे अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेप्रमाणे काल संध्याकाळी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानभवनात पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार कपील पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाची रणनीती निश्चित करताना सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला.