तामिळनाडू : तामिळनाडूमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची सहा हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना ५ जुलै रोजी संध्याकाळी घडली.
आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर ६ जणांनी हल्ला करत धारदार शस्त्रांनी वार करून रक्तबंबाळ केले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर काही मित्रांबरोबर बसले होते. यावेळी तीन दुचाकीवरून काही तरुण आले. आणि आर्मस्ट्राँग यांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र घाबरून पळून गेले. त्यानंतर हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँग यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत वार केले. आरडाओरडा होताच त्यांचे कुटुंबीय बाहेर आल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग यांचा जागीच मृत्यू झाला.