लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी उरुळीकांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात आज रविवारी (ता. १०) सुरु आहे. या निवडणुकीतील सर्वांत पहिला निकाल हाती आला आहे. कारखान्याच्या ब वर्गात आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार सागर अशोक काळभोर हे २०२ मतांनी विजयी झाले आहेत. परंतु, सध्या मतदान केंद्रात मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरु आहे. या निवडणुकीत कोणता पॅनेल विजयी होऊ शकतो? याचा कल येण्यासाठी अजूनही ५ ते ६ तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी शनिवारी (ता. ९) चुरशीने मतदान झाले. एकूण एकवीस हजार मतदारांपैकी तब्बल अकरा हजार चारशेहून अधिक मतदारांनी ६ मतदान केंद्रांवर मतदान केले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या दोन्ही पॅनेलच्या ४० उमेदवारांच्यासह एकूण ५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे..
उरुळी कांचन येथील मतदान केंद्रात मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र ११४०० × १० मतपत्रिका असून त्याचा आकडा सुमारे दीड लाखांपर्यंत जात आहे. या मतपत्रिकांचे गठ्ठे सेपरेट करण्यात येत आहे. त्यामुळे या कारखान्यावर “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल” की “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” विजयी होणार, याचा कल येण्यासाठी अजूनही ५ ते ६ तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल”,तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या दोन पॅनलपैकी कोणता पॅनल आज या निवडणुकीत बाजी मारेल व आपली सत्ता कारखान्यावर प्रस्थापित करेल, ते आज जनतेला समजणार असल्याने यशवंतच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.