उरुळी कांचन, (पुणे) : यवत हद्दीतील शेतकरी व विद्युत वितरण यांच्यातील वाद तात्पुरता मिटला असून यवत परिसरातील शेतकऱ्यांनी उरुळी कांचनचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात चालू करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे उरुळी कांचनसह परिसरातील वीजपुरवठा तब्बल सात तासानंतर सुरू झाला आहे.
यवत हद्दीतील ८० व त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा वीजबिल थकल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला होता. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी तुमची वीज नको आणि आमच्या शेतात वीजवितरणचे खांबहि नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे वीजवितरण कंपनीपुढे अभूतपूर्व प्रसंग उभा राहिला होता. त्यामुळे उरुळी कांचन, अष्टापूरसह ७ गावातील विजपुरवठा मागील सात तासांपासून बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले होते.
महावितरण कंपनीचे अधिकारी, शेतकरी यांच्यात उरुळी कांचनचा विजपुरवठा सुरुळीत करण्याबाबतचा वाद यवत पोलीस ठाण्यात पोहोचला होता.
दरम्यान, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मध्यस्थी केल्याने हा संघर्ष तात्पुरता टळला आहे. हा संघर्ष काय दिशा घेतो याच्यावर उद्याचा वीजपुरवठा निश्चित आहे.