पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले. प्रसूतीदरम्यान, तिचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जानेवारी २०२४ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडली आहे. या प्रकरणी दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील ऊर्फ मिक्या गणेश दीक्षित (रा. अप्पर, बिबवेवाडी) आणि साईदत्त ऊर्फ साहिल गोपाळ भवाळ (रा. दांडेकरपूल) अशी गुन्हा दाखल झालेल्यां तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी मृत मुलीच्या ४२ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धुणीभांडी तर, त्यांचे पती मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना मृत मुलगी आणि एक मुलगा आहे. मृत्यू झालेली मुलगी १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. चार-पाच महिन्यांपूर्वी तिला उलट्याचा त्रास होऊ लागला. तिची तपासणी केली ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यावेळी तिने तिचे निखील याच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने गरोदर असल्याचे सांगितले होते.
दोन तरुणांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले
याबाबत निखिलच्या घरच्यांना जाऊन जाब विचारू असं आई म्हणाली तेव्हा तिने निखीलच्या घरचे नकार देतील. त्यांना याबददल काही सांगायला नको, असे ती म्हणाली होती. त्यामुळे तिच्या आईने निखील आणि त्याच्या घरातील लोकांना याबददल काही सांगितले नव्हते. दरम्यान, साईदत्त ऊर्फ साहील याने देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेंबर २०२४ मध्ये साईदत्त याने देखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याशी लग्न करणार असल्याचे आईला सांगितले होते.
मुलाला दिला जन्म
त्यानंतर साईदत्त आणि तरुणी आईवडिलांच्या संमतीने कोल्हापूर येथे राहण्यास गेले होते. त्यावेळी मुलगी ६ महीन्यांची गदोदर होती. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास तरुणीने मुलाला जन्म दिला. ही माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे पती कोल्हापूरला गेले. त्यावेळी तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला कोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, तेथील उपचारांनी तिला फारसा फरक पडत नसल्याने १६ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील बिबवेवाडीमधील एका रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिच्या अंगात रक्त कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच १९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.