गुजरात : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदरा येथील हरणी मोतनाथ तलावात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. या घटनेत दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू आहे.
२७ विद्यार्थ्यांची सहल हर्णी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात बोटमधील २७ जण तलावात पडले. यामध्ये दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
वडोदरा अग्निशमन दलाचे अधिकारी पार्थ ब्रह्मभट्ट ‘पीटीआय’ला संवाद साधताना म्हणाले, शालेय विद्यार्थींची सहल बोटींगसाठी दुपारी हर्णी तलावात आली होती. पण, विद्यार्थ्यांसह ही बोट तलावात उलटली. अग्निशमन दलानं सात विद्यार्थ्यांना वाचवलं आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू आहे.
पीएम मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मला दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमीं लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि प्रत्येक जखमीला 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
#WATCH | Gujarat: A boat carrying children capsized in Vadodara’s Harni Motnath Lake. Rescue operations underway. pic.twitter.com/gC07EROBkh
— ANI (@ANI) January 18, 2024