Nagpur News : नागपूरमधून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील बाजारगावमध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला असून या घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जातं. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाला असून स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती मिळत आहे.