पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अनोळख्या व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्याने, अज्ञाताने तरुणावर ब्लेडने वार करुन जखमी करुन तसेच खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ येथे शनिवारी ४ जानेवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या परिसरात चोरट्यांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणी वडीथा गोविंदा नाईक (वय-२८, रा. आण्णाभाऊ साठे वस्ती, अप्पर डेपोच्या मागे, बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे रेल्वे स्टेशन समोरील तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरात उभे होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. त्यावर नाईक यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान, चोरट्याने नाईक यांना शिवीगाळ केली. तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खिशातील जबरदस्तीने आठशे रुपये काढून घेऊ लागला.
त्याला नाईक यांनी विरोध केला होता. मात्र, तेव्हा त्याने त्याच्या खिशातून ब्लेड काढून नाईक यांच्या चेहऱ्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. चोरटा आठशे रुपये घेऊन तेथून पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत.