पुणे : पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून महिलेवर घरात घुसून ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर लाथाबुक्यानी मारहाण करत तिच्या पतीला आणि मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मोहम्मद जानी जिलानी शेख (वय २७, रा. वटीमाटा, जि. कडपा) याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आश्रफनगर कोंढवा येथील २६ वषीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आश्रफनगर कोंढवा परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद याच्या विरुद्ध फिर्यादी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा मोहम्मदच्या मनात राग होता. शुक्रवारी फिर्यादी महिलेचा पती त्यांच्या मुलीला शाळेत जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेले होते. त्यामुळे फिर्यादी महिला घरी दोन लहान मुलांसह एकट्याच घरी होत्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहम्मद फियीदींच्या घरी आला. त्याने पूर्वी गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादींच्या गालावर, उजव्या हाताच्या मनगटावर, पोटरीवर, गळ्यावर आणि ओठावर, नाकावर ब्लेडने वार केले.
त्यानंतर देखील आरोपीने फिर्यादी महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिच्या पतीला आणि मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी महिलेने आरडा ओरडा केला. हा प्रकार शेजाऱ्यांना समजताच त्यांनी आरोपी मोहम्मद याला पकडून ठेवले. त्यानंतर कोंढवा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. शेजारील नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवले होते. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक हसीना शेख करत आहेत.