पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने संघटनात्मक बदल करण्याचे संकेत दिले असून पुण्यामध्ये भाजपचा शहराध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप पुण्यात खेळी करण्याच्या तयारीत असून महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पालिकेची संपूर्ण जान असणाऱ्या स्थानिक नेत्याची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. या दृष्टिकोनातून सर्वप्रथम सभासद नोंदणी अभियान पक्षाकडून हाती घेण्यात आलं होतं. पुण्यात देखील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झाली असून 60 ते 70 हजार सभासद नोंदणी प्रत्येक मतदारसंघात करण्यात आली आहे. हे सभासद नोंदणी अभियान यशस्वी झाल्यानंतर आता भाजपकडून संघटनात्मक मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील महिना पंधरा दिवसांमध्ये प्रभाग अध्यक्ष पासून ते मंडल अध्यक्षापर्यंत नव्या नियुक्त केल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतही आता भाजप बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.