पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारभारावरून सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेकडे राहिलेल्या परिवहन खात्यात आणि एसटी महामंडळात भाजप स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी महामंडळात एक स्वतंत्र राजकीय ‘उपाध्यक्ष’ पद तयार करून त्यावर भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तोट्यात असलेल्या एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी घेतलेल्या काही धाडसी निर्णयांमुळे ग्रामीण भागात त्यांची पकड मजबूत होत आहे. एसटीचा थेट संपर्क थेट सामान्य जनतेशी येत असल्याने सरनाईक यांची वाढती लोकप्रियता शिवसेनेचा प्रभाव वाढवत आहे. याच लोकप्रियतेला राजकीय ब्रेक लावण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपने ही नवी खेळी खेळल्याचा दावा केला जात आहे.

सध्या एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्ही प्रशासकीय जबाबदाऱ्या डॉ. माधव कुसेकर सांभाळत आहेत. परंतु, आता उपाध्यक्ष हे पद प्रशासनापासून वेगळे करून ते राजकीय नेत्याकडे सोपवण्याची योजना आखली जात आहे. यासाठी भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, महामंडळात दोन वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेतृत्व निर्माण झाल्यास कामात सुसूत्रता राहण्याऐवजी अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातील संभाव्य राजकीय खेळीमुळे निर्णय प्रक्रियेला उशीर होऊन एसटी प्रशासनाचा कारभार अधिकच अडचणीत येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






