पुणे : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी 26 जुलै रोजी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.ते म्हणाले की, “विद्यार्थी अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते, परंतु केंद्र सरकारने त्यांच्यावर बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पूर्वी भाजप जेव्हा विरोधात होता, तेव्हा ते छोट्या-छोट्या गोष्टींवरून इतरांच्या राजीनाम्याची मागणी करत असे. मग आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाही?” नीट परीक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या परीक्षेला सुरुवातीपासूनच आमचा विरोध होता, पण सत्तेच्या मग्रुरीमुळे सरकारने कुणाचेही ऐकले नाही असे त्यांनी म्हटले आहे

सरकारच्या धोरणांवर टीका करताना राज ठाकरे पुढे म्हणाले, “आधी देशात शेतकरी आत्महत्या करत होते, आता विद्यार्थ्यांवर ती वेळ आली आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून लोकांच्या मनात विद्यमान व्यवस्थेबद्दल प्रचंड राग आहे. शेतकरी आंदोलन असो, मणिपूरचा विषय असो किंवा ग्रामीण भागातील प्रश्न; सरकार कोणाचेही ऐकायला तयार नाही असा हल्लाबोल त्यांनी चढवला.

ठाकरे बंधुकडून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यासाठी 26 जुलै रोजी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दादर येथील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथून निघून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. यामध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सिद्धिविनायकाला जाऊन या समस्येतून मार्ग काढण्यासाठी साकडे घातले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.







