शिक्रापूर : शिरूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत असून दीड महिन्यात तीन बालकांचा बळी गेलेला असताना मात्र शिरूर तालुक्याला वनपरिक्षेत्र अधिकारीच नसून अन्य कर्मचाऱ्यांचीदेखील संख्या कमी असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरा. तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करा आणि बिबट्यांचा बंदोबस्त होत नसेल, तर बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सह अन्य विभागाकडे केली आहे.
शिरुर तालुक्यातील वेगवेगळ्या भागामध्ये मनुष्यांसह पशुधनावर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना अलीकडील काळात दीड महिन्यात तीन लहान बालकांचा बळी बिबट्याने घेतला असून हजारो पशुधानांवर देखील हल्ले करुन ठार केल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र शिरुर तालुक्याला मुख्य असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी पदच रिक्त आहेत. तर अनेक वनपाल व वनरक्षकासह वनविभागाच्या जागा रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे दिसत आहे. अलीकडील काळात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने वनविभागाला वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वनपाल, वनमजूर यांच्या रिक्त जागा भराव्या, बिबट्या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये, गाय म्हैस यांना एक लाख रुपये तर शेळ्या, मेंढ्यांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.
तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी देत शस्र उपलब्ध करुन द्यावे, कायद्यात बदल करण्याची गरज असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव तयार करुन शासनाला द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, तहसीलदार यांना निवेदन देत केली आहे.